नवी दिल्ली येथील कॉर्पोरेट अँड फायनान्स क्षेत्रातील पीएचडी डॉ. अशोक पागिरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा व समाजप्रेम जागवणारा उपक्रम राबवण्यात आला. संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळा, बारादारी (मेहेकरी फाटा, ता. जिल्हा अहिल्यानगर) येथे भटके-विमुक्त, ओबीसी, आदिवासी, ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी मजूर अशा वंचित, गोरगरीब, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व अल्पोपहार वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रितेश शेठ अनमल , निसर्गोपचार तज्ञ डॉ. अनिल उदावंत, संस्थेचे सचिव डॉ. भगवान वाघ, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर, अधिक्षक डोळे सर, तसेच सहशिक्षक नागरे सर, चौधरी सर, जाधव सर, गिते सर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे बुके, गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेच्या वतीने नागरे सर, डोळे सर व प्रकाश शिंदे सर यांनी डॉ. पागिरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. अनिल उदावंत व उद्योजक रितेश शेठ यांनीही मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. भगवान वाघ होते. प्रमुख पाहुणे डॉ. अशोक पागिरे साहेब यांनी आपल्या मनोगतात मिलिंद फुंदे सरांनी शाळेसाठी केलेल्या संघर्षाचे कौतुक करत पुढील काळात शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. तसेच समाजातील सहकाऱ्यांनाही शाळेसाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे वचन दिले.
डॉ. भगवान वाघ यांनी संस्थेच्या उभारणीची प्रेरणादायी माहिती उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष गर्जे सर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक करत संस्थेची वाटचाल, उद्दिष्टे व सध्या सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केक कापून डॉ. अशोक पागिरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर शालेय साहित्य वाटप व अल्पोपहार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप गणेश नागरे सर यांनी आभार प्रदर्शनाने केला.
— संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर
श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळा, बारदारी (अहिल्यानगर)
उद्योजक अनमल साहेब यांच्यातर्फे आश्रमशाळेतील मुलांना अन्नदान
